उन्नत महाराष्ट्र अभियान
राज्यातील विविध सामाजिक विकास विषयक समस्यांवर उच्च शिक्षण संस्थांतील प्रचलित संशोधनाच्या सहाय्याने तोडगा काढण्याच्या दृष्टीने विविध शासकीय यंत्रणा (उदा. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद) संबंधित विभागातील उच्च शिक्षण संस्था आणि उच्च व तंत्रशिक्षण संचालनालय यांना एकत्र आणून सदर योजना राबविण्यात येते.
शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक: बैठक-3611/(56/15)/तांशि-2 दिनांक 13 जानेवारी, २०१6 च्या शासन निर्णयान्वये सदरची योजना राबविण्यास मान्यता देण्यांत आली आहे.
अभियानाची उददीष्टे :-
- स्थानिक पातळीवरील समस्यांची उचित तंत्रज्ञानाचा वापर करुन उकल करण्यासाठी तसेच संशोधनाव्दारे विकासाला चालना देण्यासाठी आणि या क्षेत्रात कार्यरत विविध शासकीय यंत्राणांची मदत उपलब्ध होण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे.
- उच्च व तंत्र शिक्षण संस्थांत अभ्यासक्रम आणि संशोधन स्थानिक पातळीवरील विकास योजना/ समस्यांशी एकरेखित (Align) करणे / त्यांची सांगड घालणे.
- निवड केलेल्या संस्थांमध्ये त्या-त्या परिसरातील समाजाच्या विकास विषयक समस्यांवर संशोधन करण्यासाठी तंत्रज्ञान आणि विकास कक्ष स्थापित करणे आणि राज्य स्तरावर या संशोधनाच्या अनुषंगाने माहिती-कोष तयार करुन तो सामान्य नागरिकांना देखील सुलभ होईल, अशा पध्दतीने जतन करणे.